marathi blogs widgets

पुस्तक परीक्षा

प्रसिध्दी- आपलं महानगर28 aug 2011
एका संमेलनाध्यक्षाची 'उत्तम' डायरी
प्रशांत गायकवाड
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे संमेलन आपल्याकडे एखादा उत्सवाप्रमाणे साजरं केलं जातं. या संमेलनाला वादाची परंपरा आहे. वाद नाही ते संमेलन कसलं, असंही गमतीने म्हटलं जातं. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असणार? इथपासून कोणत्या ठिकाणी ते साजरं होणार? याला फारच महत्त्व असतं. अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे फारच कसोटीचा काळ असतो. सारी शक्ती पणाला लावली जाते. या निवडणुकीत किती मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी वेळेचं नियोजन कसं करावं
लागतं, माणसं कशी जोडावी लागतात आणि योग्य नियोजन केलं तर आपण कसं यशस्वी होऊ शकतो, हे सारं काही ठाण्यात साजरं झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्यांच्या 'एका संमेलनाध्यक्षाची निवडणूक डायरी' या पुस्तकात मांडलं आहे. माणूस कितीही उंचीवर पोहोचला तरी जमिनीवर पाय ठेवून कसं चालावं अशी किमया कांबळेंनी
साहित्य संमेलनाच्या निवडीतून साधली आहे. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते निवडीपर्यंतचा प्रवास कांबळे यांनी उत्तमरितीने या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच 'डायरी वाचण्यापूर्वी' या भागात कांबळेंनी मीही अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा एक टीकाकार होतो, असं स्पष्ट केलं आहे. या एका वाक्यावरूनच ते किती स्पष्टवक्ते आहेत हे लगेच कळतं आणि पुस्तक वाचताना जाणवतंदेखील. या निवडणुकीमधील मतदार महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पसरले आहेत हेही वाचकांना या पुस्तकामुळे कळतं. निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीचा घटनाक्रम तारखेसहित यात लिहिण्यात आला आहे आणि ते वाचताना वाचकांना डायरी कशी लिहावी याचंही ज्ञान होत जातं. पुस्तकात अनेक लेखकांची नावं लिहिण्यात आल्याने मराठीतल्या लेखकांची नावंदेखील वाचकांना कळतात.
सांगलीत भरलेल्या ८१ व्या साहित्य संमेलनाचे कांबळे स्वागताध्यक्ष होते आणि त्या वेळी त्यांना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ यशवंत रावीकर यांनी तुम्ही
स्वागताध्यक्ष झालात ही आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही अध्यक्ष झाल्याचं मला पाहायचं आहे. पण कांबळे यांनी हे शक्य नाही, असं सांगितल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. ही घटना २००७ सालातली. त्यानंतर पलुस येथे भरलेल्या एका साहित्य संमेलनात मिलिंद जोशींनी कांबळेसाहेबांना एक दिवस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झालेलं आम्हाला पाहायचे आहे, असं म्हटल्याचं लिहिलं आहे. तिथपासून बरोबर तीन वर्षांनी कांबळेंनी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान साधला आणि तो यशस्वीदेखील करून दाखवला.
जून आणि जुलै २०१० या महिन्यांत कांबळेची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होते ती बरोबर संमेलन साजरं होईपर्यंत २८ डिसेंबर २०१० पर्यंत चालते. पुस्तकाच्या शेवटच्या कव्हरवर कांबळेनी साहित्य क्षेत्रातील राजकारणाला कसं तोंड दयायचं या विषयी मला शिकता आलं. ते सर्वांना उपयोगी पडावं यासाठीच ही डायरी आहे असं लिहीलं आहे. पुस्तकात गमतीदार प्रसंगही आहेत. कांबळे साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी उभं राहायचं ठरवतात आणि त्यांची पत्नी त्यांच्या सार्‍या नातेवाइकांना फोन करून सांगते की, हे अध्यक्ष होणार आहेत. आपण सारे संमेलनाला जायचं असं आग्रहाचं आमंत्रण सार्‍यांना देऊन टाकतात. त्या वेळी त्यांच्या मावसभावाचा शिरोळहून फोन येतो आणि तो म्हणतो, कधी यायचं आम्ही ठाण्याला. तेव्हा कांबळे चिडून म्हणतात, कशात काही नाही आणि ही कशी काय
निमंत्रण देते. तर दुसरा प्रसंग - तेव्हा कांबळे निवडणुकीला उभे राहून मतदानाच्या रणधुमाळीत उतरलेले असतात. धुळ्याहून एका कार्यकर्त्याचा फोन कांबळेंना येतो. आमच्याकडे शंभरेक सदस्य आहेत. सर्वांची मते तुम्हाला देतो असं तो म्हणतो. त्या वेळी धुळ्यात एवढी मतं कशी? असा प्रश्न कांबळेंना पडतो. नंतर त्यांची शंका दूर होते. परिषदेचे सदस्य म्हणजेच आपण मतदार आहोत अशी कार्यकर्त्याची भावना झालेली असते. मात्र धुळ्यात एकच मतदार असतो. भाबडेपणाचे हे दोन्ही प्रसंग छान आहेत. असाच एक प्रसंग आहे
संमेलनाध्यक्षपदाची मतमोजणी सुरू असते. कांबळेंना ५ के (5k) असा जाखडेंचा एसएमएस येतो. जाखडे मतमोजणी केंद्रात असतात. कांबळेंना ५ के (5k) या शब्दाचा अर्थ कळत नव्हता. मतमोजणी सुरू असल्यामुळे जाखडे फोन घेत नव्हते. त्यानंतर कांबळे निवडून आल्यावर ते जाखडेंना विचारतात, ५ के (5k)म्हणजे काय? तेव्हा जाखडे म्हणतात, मला ओके (ok) म्हणायचं होतं.
पण ओ (o)ऐवजी ५ दाबलं. त्याचबरोबर पुस्तकात डोळे पाणवतील असेही प्रसंग आहेत, कांबळेंना मुलगा मानणार्‍या आई गणोरकरांचा हा किस्सा. कांबळे त्यांना फोन करतात. आई म्हणतात, 'काही काळजी करू नकोस. आईचा आशीर्वाद आहे. तूच विजयी होणार. आता
तुझ्यासाठी पोथी वाचन सुरू करणार आहे. आईचा आशीर्वाद वाया जात नाही.' यानंतर कांबळे लिहितात, माणसं किती प्रेम करतात. नास्तिकासाठी पोथी वाचतात. नंतरचा प्रसंग आहे तो कविवर्य नारायण सुर्वे यांच्या निधनाचा. निवडणुकीत कांबळे यांनी प्रचारासाठी आधुनिक पद्धत वापरली. त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हाइस मेल या तंत्राचा वापर केल्याचं लिहीलं आहे. यावर 'लोकसत्ता' या वृत्तपत्रातील बातमीदाराचा फोन कांबळे यांना येतो. तो विचारतो, निवडणुकीत इतक्या मोठा प्रमाणात पैसे कसे काय
खर्च करता? त्यावर कांबळे म्हणतात, पैसे नाहीत म्हणून तर ई-प्रचार करतोय. कारण मतदार भेटत नाहीत. सर्व मतदारांना फोन केल्यास एका वेळेला तीन हजार रुपये लागतात. व्हाइस मेल आठशे रुपयांत आणि सार्‍यांना एसएमएस पाठवायचा झाल्यास फक्त ऐंशी रुपयांत, असं सांगून खर्चात कपात कशी करावी हे कांबळे यांनी उदाहरणासह दाखवून दिलं आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कांबळे ४११ या मताधिक्याने विजयी झाले. येथून त्यांच्या अध्यक्षपदाचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर अनेक घडामोडी घडतात. २५ डिसेंबर संमेलनाच्या उद्घाटनाचा दिवस. कांबळे भाषणाला सुरुवात करतात. टाळ्यांचा कडकडाट .'सीमा बांधवांचा सीमाप्रश्न सुटलाच पाहिजे,' अशा घोषणा. भाषण संपल्यावर नव्या वादाला सुरुवात. एक जण येतो, कांबळेंना स्मरणिकेत नथुराम गोडसेचा
गौरव झाल्याचं सांगतो. कांबळेंना जबर धक्का बसतो. उत्तम कांबळेंच्या राजीनाम्याची मागणी. कांबळेंकडून गोडसे प्रकरणाचा निषेध.
प्रसारमाध्यमांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना कांबळेंचं चोख उत्तर. असे अनेक सुखद-दुखद अनुभव घेत अखेरीस २८ डिसेंबर रोजी डायरी संपते. संमेलनाध्यक्षपदाचा अर्ज भरल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत उत्तम कांबळेंनी घेतलेले कष्ट , त्यांना त्यांच्या मित्रांनी दिलेली साथ, पितृतुल्य अशा नारायण सुर्वे यांचं आजारपण, त्यांचा मृत्यू. कांबळे व्यस्त असतानादेखील सुर्व्यांच्या प्रकृतीविषयी त्यांना वाटणारी चिंता, संमेलनात झालेले आरोप, उकरून काढण्यात आलेले वाद अशा प्रवासाचा या डायरीतून वेध घेण्यात आला आहे. सातत्याने केली जाणारी धावपळ आणि दांडगा जनसंपर्क हे सगळं वाचताना या माणसात इतकी ऊर्जा येते कुठून? असा प्रश्न
सतत पडत राहतो

पुस्तक - एका संमेलनाध्यक्षाची निवडणूक डायरी
लेखक - उत्तम कांबळे
किंमत - १८० रुपये
प्रकाशक- लोकवाङ्मय गृह

"मारुतीचे आव्हानात्मक उड्डाण "
पुस्तक परीक्षण- प्रशांत गायकवाड
प्रसिध्दी- आपलं महानगर,१२ जून २०११

वाहन उद्योग क्षेत्रात आग्रेसर असणार्‍या मारुती-सुझुकी कंपनीतील कामगारांनी नुकताच संप केला.यामुळे कंपनीचं २०० कोटींचं नुकसान झालं.ते अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ही झाली आजची गोष्ट . पण हा मारुती उद्योग उभारण्यासाठी जे अथक परिश्रम घेण्यात आले त्या उद्योगाची कहाणी पुस्तकरुपाने " कथा मारुती उद्योगाची " या मराठीत अनुवाद झालेल्या पुस्तकात मांडण्यात आली आहे. मारुती उद्योग समूहाचे चेअरमन आर.सी.भार्गव हे मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक असून पत्रकार सीता यांनी सहलेखनाची जबाबदारी पार पाडली आहे. मराठीत
जॊन कोलासो यांनी अभियांत्रिकी भाषेचा कोठेही स्पर्श न होता ज्या प्रमाणं अनुवाद केला आहे त्याला तोड नाही. नवख्या उद्योजकांना हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की. ऒटोमोबाईल , अर्थशास्त्र, बिझनेस मॆनेजमेंट चे विद्यार्थी, आर्थिक विषयांवर लेखन करणारे पत्रकार आणि आपल्या देशातील वाहननिर्मिती हे जाणून घेण्याची इच्छा असणा‍र्‍या प्रत्येकानं हे पुस्तक वाचण्याची गरज आहे.
दहा टप्प्यात पुस्तक विभागले गेले आहे.उद्योगाचीस्थापना करण्याअगोदरचा इतिहास ते आजतगायत कंपनीचा सुरू असलेला प्रवास शब्दबध्द करण्यात आला आहे. त्याला ध्येय्य ,स्वप्नं यांची किनार आहे हे वाचताना त्वरित लक्षात येते. मारुतीची स्थापना १९८१ मध्ये करण्यात आली. तेव्हापासून ते १९९२ पर्यंत तो सार्वजनिक उपक्रम होता. पुढे सुझुकी मोटर कार्पोरेशन आणि सरकार समान भागिदार बनले आणि मारूतीचा सार्वजनिक उपक्रमातील कंपनी हा दर्जा संपला. डिसेंबर १९८३ रोजी मारुती -८०० ही गाडी कंपनीतून बाहेर पडली आणि कंपनीची घौडदोड सुरू झाली. अर्थात कोणत्याही उद्योगात अनेक चढउतार येत असतात, मारुतीनेही असे अनेक चढउतार पाहिले, मात्र कंपनी डगमगली नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपूत्र संजय गांधी यांनी जनतेची गाडी बनवायची असं स्वप्न उराशी बाळगल होते . ते घेऊनच ते ब्रिटनहून १९६६ च्या सुमारास भारतात परतले होते. .त्या काळात भारतात यांत्रिकीकरणाचा अभाव होता , देशातील परिस्थिती उधोगांसाठी अनुकूल नव्हती , समाजवादाचा प्रभाव इथल्या राजकारण्यांवर होता, ‍इथूनच पुस्तकाला खरी सुरुवात होते आणि मन थक्क करणारा मारुती उद्योगाचा प्रवास हळुहळू उलगडत जातो. सार्वजनिक उधोग आणि खाजगी उद्योग यांतील सुक्ष्म फरक या पुस्तकात सूत्रबध्दरितीनं मांडण्यात आला आहे.खास करून सार्वजनिक उद्योगातील बारकावे याठीकाणी आपल्याला जवळून कळतात.

संजय गांधींनी ४ जून १९७१ ला मारुती मोटर्स या कंपनीची स्थापना केली होती. मात्र या कंपनीत गाड्यांचे व्यापारी उत्पादन झालेच नाही. त्यानंतर बिगर कॊंग्रेसी सरकारच्या काळात कंपनीच्या कारभाराच्या चौकशीचे देण्यात आलेले आदेश, न्यायालयीन चौकशी, कंपनीचा गाशा गुंडाळण्याचे आदेश ,कालांतराने संजय गांधींचा झालेला अपघाती मृत्यू या चक्रात कंपनी अडकली. परंतु इंदिरा गांधींना आपल्या मुलासोबत त्याचे स्वप्न लयास जाणे मंजूर नव्हते , त्यांनी मोठ्या ध्येय्यानं मारुतीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणं पावलं टाकायला सुरुवात केली .आपल्या दूरदृष्टीनं व्यवस्थापकीय कौशल्य असणार्‍या माणसांची नेमणूक त्यांनी केली. १९८१ रोजी मारुती उद्योग या कंपनीची स्थापना करण्यात आली, डिसेंबर १९८३ ला पहिली गाडी कारखान्यातून बाहेर पडली. ही कंपनी १०० टक्के सरकारी मालकीची होती. आणि पुढे याच कंपनीनं भारतीय वाहनाउद्योगात स्वप्नवत वाटणारी क्रांती घडवली. आर.सी. भार्गव यांनी मारुतीच्या जडणघडणीत सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांनी त्यातील बारकावे ठळकपणे वाचकांसमोर मांडले आहेत.
सर्वसामान्यांना परवडणारी गाडी कशी असावी ? इथपासून भागीदार बनणार्‍या कंपनीचा शोध त्यासाठी घेतला गेला होता. अखेरीस जपानच्या सुझुकी या कंपनीनं तयारी दाखवली आणि उद्योगास सुरुवात झाली. सरकारी कंपनी असल्यामुळे कामकाजात अनेक वेळा व्यत्यय येत, निर्णय घेण्यास वेळ लागत. मात्र नेमण्यात आलेल्या कार्यकारी मंडळाने अडचणींवर मात केली आणि उद्योग यशस्वी केला. अर्थात कंपनीच्या वाढीला त्या काळात नकोशा झालेल्या इतर कंपनीच्या मॊडेल्सही कारणीभूत ठरल्या , हे इथं मुद्दामहून नमूद करावंस वाटतं. गाडीचं बुकिंग ९ एप्रिल १९८३ रोजी करण्यात आलं आणि बघता बघता कंपनीकडे ८ जूनपर्यंत १ लाख ३५ हजाराहून अधिक गाड्यांची नोंदणी झाली. म्हणजेच गाडी बाजारपेठेत येण्याअगोदरच कंपनीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता , त्याव्दारेच कंपनीकडे खेळतं भांडवल जमा झालं होते. पुढे गाडी बाजारपेठेत आली आणि तिने भारतीयचं नव्हे जगभरातील बाजारपेठा काबिज केल्या . एव्हाना कंपनी पूर्णपणे प्रस्थापित झाली होती. पुढे कंपनीने अनेक कार मॊडेल्सची निर्मिती केली. मात्र मारुती ८०० ला ज्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला तसा प्रतिसाद इतर मॊडेल्सना लाभला नाही. उद्योगात भांडवलाचई कमतरता , नफा - तोटा , या बाबी होतच असतात. मारुती उद्योगातही हे घडलं तरीही कंपनीनं आपला डोलारा उभा केला. कथा मारुती उद्योगाची हे पुस्तक आव्हान कसं स्वीकारावं , वेळेचं महत्व , निर्णय घेण्याची कुवत , बाजारपेठेसाठी आवश्यक कौशल्य हे सारं काही शिकवतं. त्यामुळेच संग्रही ठेवण्यासाठी उत्तम पुस्तक म्हणून त्याच वर्णन करावं तेवढं थोडचं आहे.
कथा मारुती उद्योगाची
अनुवाद- जॊन कोलासो
प्रकाशक - रोहन प्रकाशन
मूल्य - २२५ रुपये

कॊम्रेड गोविंद पानसरे गौरव ग्रंथ (आपलं महानगर-२३ जानेवारी २०११)
संपादक - प्राचार्य डॊ. सुनिलकुमार लवटे
प्रकाशक - कॊम्रेड गोविंद पानसरे अमृत महोत्सव समिती
पाने -२२५
कम्युनिष्ट चळवळीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे पुस्तक असून , कॊ. गोविंद पानसरे यांच्या अमृत महोत्सावानिमित्त हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पानसरे यांचा जीवनप्रवास (खरेतर कम्युनिष्ट चळवळीला वाहून घेतलेल्या कॊम्रेड्सच्या जीवनाचा प्रवास खडतरच असतो.) या पुस्तकात त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तिंनी शब्द रुपात मांडलेला आहे. हे पुस्तक एकूण सहा भागात विभागले आहे. त्यात गौरव लेख, सहकार्‍यांच्या नजरेतून पानसरे , प्रतिबिंब , आत्मियांच्या नजरेतून , मुलाखात , पुरस्कार आणि सन्मान असे भाग आहेत.
कॊ. पानसरे आजगायत या चळवळीशी कसे प्रामाणिक राहीले आहेत ते पुस्तक वाचताना त्वरीत लक्षात येते.थोडक्या शब्दात मांडणी , चित्रांची सोबत यांद्वारे हा ग्रंथ सजला आहे. आपला मुलगा अविनाश याला तरुण पणी आलेले अकाली मरण त्यातून सावरणारे पानसरे..मुलाच्या अंत्ययात्रेच्या समयी एक प्रसंग पुस्तकात लिहीण्यात आला आहे त्यात त्यांच्या मुलाची अंत्ययात्रा निघालेली असते , त्याचक्षणी पानसरे जोशाने जमलेल्या जनसमुदायासमोर येऊन म्हणतात अविनाश पानसरे का काम कौन पुरा करेगा ? समुदायातून घोषणा येतात हम करेंगे हम करेंगे ! हा प्रसंग वाचूनच चळवळीप्रती त्यांची निष्ठा किती ठाम आहे हे दिसून येते. पानसरेंच्या पत्नी सौ. उमा पानसरे यांचे मुलाखात रुपी " माणसातला माझा माणूस" शब्दांकन आहे. (या वाक्यावरूनच कॊ. गोविंद पानसरेंचे व्यक्तीमत्व लक्षात येते )
असे पानसरेंचे अनेक प्रसंग त्यांच्या सहवासातील व्यक्तींनी पुस्तकात मांडलेले आहेत.
त्यात कॊ. ए.बी. बर्धन, भाई वैध, कॊ. भालचंद्र कानगो आदी मिळूण ४५ जणांचा समावेश आहे. सकाळ वृत्त समूहाचे संपादक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पानसरेंची घेतलेली मुलाखतही या पुस्तकात दिलेली आहे. त्यात कॊम्रेडांच्या जिवनाचे पैलू थोडक्यात पण मुद्देसूद मांडले आहेत. ही मुलाखात उत्तरोत्तर रंगत गेलेली आहे . तसेच बोर्डींगमधले दिवस हा कॊं पानसरेंचा लेख आहे ; त्यात त्यांनी माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत कशा प्रकारे या बोर्डींगचा हातभार लाभला हे कृतड्न्यतापूर्वक नमूद केले आहे. याचे दिवसांचे शब्दांकन पत्रकार राम जगताप यांनी केले आहे. पुस्तकाच्या शेवटी पानसरेंचा जिवनपटाचा सारांश , ते चालवत असलेल्या संघटनांची नावे , त्यांना मिळालेले पुरस्कार आणि या सारांशरूपी ग्रंथात ज्या ज्या लेखकांनी त्यांच्याविषयी लिहीले आहे त्यांची माहिती देण्यात आली आहे. पुस्तक वाचताना आणि संपेपर्यंत पानसरेंनी प्रस्थापीत व्यवस्थेविरुध्द दिलेले लढे , बांधलेल्या संघटना ,केलेला त्याग यांचा कालक्रम उलगडत जातो , हे जरी खरे असले तरी आज भारतीय कम्युनिष्ट पक्षाची सामाजिक चळवळीत सदैव अग्रेसर असणार्‍या महाराष्ट्रात पीछेहाट होत आहे याचीच आठवण येत राहते. पण हा ग्रंथ कम्युनिष्टच नव्हे तर प्रामाणिक पणे काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याने वाचल्यास त्याला नक्कीच लढण्यासाठी दिशा मिळेल आणि नाहीशा होत चाललेल्या चळवळींना काही प्रमाणात का होईना बळ प्राप्त होईल.

- प्रशांत गायकवाड


’पथिक ’- एका कम्युनिष्ट कार्यकर्त्याचे आत्मकथन(पुस्तक परिचय
१७ जाने
आपल्या मराठी साहीत्यात अनेक लेखकांची आत्मकथने प्रसिद्ध आहेत.लहानपणी शाळेत असणार्‍या निबंधांतून आपण झाडाचे,पक्ष्याचे,इतर आत्मकथने कल्पनाशक्तीतून किंवा कुवतीनुसार एक किंवा दोन पानातं मांडतो पण जीवनाचे सार पुस्तकरुपाने मांडणे आपल्यातल्या प्रत्येकालाच शक्य होत नाही,त्यासाठी लढाऊपण,सोसलेल्या हालअपेष्टा,वेळप्रसंगी तडजोडीची तयारी,व्यापक जनसंपर्क,कणखरपणा,समाजकार्य इत्यादींची जोड असावी लागते.ज्यांना हे शक्य होते त्यांनाच आत्मकथने शोभून दिसतात."पथिक" या मदन नाईक या कम्युनिष्ट कार्यकर्त्यांनी लिहीलेल्या आत्मकथनात अशेच गुण दिसून येतात.सुटसुटीत पणे लिहीलेले शब्द ,सोपी मराठी भाषा यांमुळे आत्मकथन केव्हा वाचून संपते हे कळत देखील नाही पुस्तकाच्या सुरूवातीला माजी महापालीका आयुक्त व गृहनिर्माणे सचिव एस.एस. तिनईकर यांचे पत्र आहे त्यात त्यांनी शेवटच्या परिच्छेदात कॊ.मदन नाईकांवर टिका केली आहे अर्थात मदन नाईकांनी ती टिका कशी चुकीची आहे हे पुस्तकात सांगितलेले आहे.प्रस्तावना कॊ.कुमार शिराळकर यांची आहे.पुस्तक सुरू होताना निसर्गरम्य तळकोकण डोळ्यासमोर येतो त्याचे नाईकांनी फार सुरेख वर्णनं केले आहे.लेखकाचे बालपण,घरातली माणसे,अनुभवलेली गरीबी,शिक्षण तेथून मुंबईला प्रयाण मग नोकरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काम,निवारयाचा शोध,झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नावर काम नंतर कम्युनिष्ट पक्षातला प्रवेश,विरोधी बाजूकडून हल्ला,सरकारी यंत्रणेशी दोन हात,चांगल्या माणसांशी लाभलेली साथ इत्यादींचा उहापोह आत्मकथनात प्रसिद्ध केला आहे खास करून नोकरीत असताना लेखकाने दाखविलेला प्रामाणिक पणा वाखाणण्याजोगा आहे.झोपडपट्टीधारकांसाठी काम करत असताना अचानक कम्युनिष्ट विचारधारा पटल्यानंतर पक्षाचा पुर्णवेळ सभासद होऊन लेखकाने पुढे आपला संसार कसा चालणार याची पर्वा केली नाही अर्थात त्यासाठी त्यांनी त्यांच्या गृहकर्तव्य दक्ष पत्नीचे मनोमन आभार मानले आहेत.त्या काळात भांडूप-विक्रोळी भागात होणारे राडे त्यांच्याशी दोन होत करण्याचे आव्हान लेखकाने आपल्या सार्वजनिक जीवनात आपल्या इतर सहकारयांद्वारा यथायोग्य पेलले आहे हे पुस्तक वाचताना कळुन येते. पुस्तकात अनेक प्रसंग आहेत त्यात लेखकाच्या बुद्धीचातुर्याची ओळख होते खास करून हिंदुस्थान लीवर मध्ये नोकरीत असताना आणि वामनराव पै यांच्या सभेतील.महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रभाकर कुंटे यांचा आवर्जुन उल्लेख पुस्तकात केला गेला आहे.पुस्तकात - शेवटी उरलेलं आयुष्य पक्ष कार्यास उपयोगी पडावं आणि जगाचा निरोप घेताना अंगावर लाल झेंडा असावा हिच अंतिम इच्छा !! असे वाक्य आहे हे वाक्यच नाईकांची पक्षावरील निष्ठा प्रगट करतो.कम्युनिष्ट चळवळीचा विक्रोळी - भांडुप भागात का विस्तार झाला नाही असा पुस्तक वाचताना प्रश्न पडतो हे नक्की असो !

केवळ कम्युनिष्ट कार्यकर्त्यांनीच नव्हे तर इतरांनीही हे अनुभव संपन्न पुस्तक जरुर वाचावे.



"पथिक"

एका कम्युनिष्ट कार्यकर्त्याचे आत्मकथन

लेखक- कॊ.मदन नाईक.

प्रकाशक-भाडेकरू कृती समिती,भांडुप

मुल्य-१५०रुपये.


Followers