marathi blogs widgets

लेख , गझल,कविता

 निवडणूकपूर्व अंदाजातून लक्ष्यभेद
-प्रशांत गायकवाड
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल दिला, हे १९ ऒक्टोबरला स्पष्ट होईलच, तत्पूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण करणार्‍या कंपन्यांनी त्यांचा निवडणूकीचा निकालपूर्व कौल जाहीर केला. त्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असे दाखविण्यात आले आहे. समजा १९ तारखेला भाजपला जास्त जागा मिळाल्यास आमचा अंदाज खरा कसा खरा ठरला, हे दाखवण्याची स्पर्धा या वृत्त वाहिन्यांमध्ये लागेल जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर मात्र सर्व्हेक्षणवाले तोंडघशी पडतील.
इथे त्या त्या वृत्तवाहिन्यांच्या सर्व्हेक्षणाला आवाहन देण्याचा प्रयत्न नाही. परंतु, त्याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. मुळात सर्व्हेक्षण कशा प्रकारे केले जाते हे समजून घ्यायला हवे. सर्व्हेक्षण हे गृहीतकावर अवलंबून असते. अर्थात त्यात Quantitative (संख्यात्मक) आणि Qualitative (गुणात्मक) हे घटक असतात. संख्यात्मक सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष नेहमी आकड्यांमध्ये असतो. उदाहरणार्थ शिवसेनेला २८८ पैकी १२७ जागा मिळतील हे झाले संख्यात्मक तर गुणात्मक सर्वेक्षणात आकड्यांच्या मगील वास्तव किंवा कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ शिवसेनेला १२७ जागा कोणत्या आधारे मिळतील याचे गणित मांडले जाते. त्यात मतदारसंघात केलेली कामे, त्यांच्या नेत्याचा करिश्मा, पक्षाचा प्रभाव आदींचा विचार केला जातो. कोणत्याही सर्व्हेक्षणात काही नमुन्यांचे परिक्षण करून व्यापक निष्कर्षावर पोहचणे शक्य असते. जसे समजा दादर भागाचे सर्वेक्षण करायचे असल्यास तेथील काही नागरिकांची मते घेतली जातात आणि त्यातून निघालेला निष्कर्ष संपूर्ण दादर विभागाला लागू केला जातो. या ठिकाणी सर्व्हेक्षणाच्या नमुन्यांची निवड ही सर्वसमावेशक हवी. या पार्श्वभुमीवर निकालपूर्व कौलाचा मतदारांवर मारा करण्याचा प्रयत्नच केला जात आहे.  
एखाद्या भागाचे संपूर्ण सर्वेक्षण झाले तरी त्या भागातील मतदारांची बदलणारी मानसिकता लक्षात येऊ शकत नाही. झालेले सर्वेक्षण किती दिवस आधी झाले हे आज तरी सर्वेक्षण करणार्‍यांनी सांगितलेले नाही. समजा जे सर्वेक्षण एक महिना आधी झाले, तेव्हा मतदारांचा कौल वेगळा असू शकेल. तेव्हा युती आणि आघाडी अस्तित्त्वात होती. मतदानाला काही दिवसच शिल्लक असताना युती किंवा आघाडी तुटल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे मतदारांच्या मानसिकतेत बदल झाला नाही हे कौल दाखविणारे सिद्ध करू शकतात का? एखाद्या नेत्याची सभा त्या भागातील वातावरण बदलवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॊंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या आणि गाजवल्या. या नेत्यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. असे असताना जाहीर झालेल्या कौलामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी वळगता सर्वच पक्षांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करणारा आहे. निकालानंतर कोणाचे नेतृत्व सक्षम आहे, ते दिसेलच. परंतु त्याआधीच कौल जाहीर करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, कोणाचा पाठिंबा हवा हे सांगणे सुरू झाले आहे. ज्या प्रमाणे शिवसेना- भाजप युती आणि कॊंग्रेस राष्ट्र्वादी आघाडी तुटेल हे सांगता येत नव्हते. त्याच प्रमाणे निकालानंतर कोणते पक्ष एकत्र येतील हे सांगणे कठीण आहे. त्यानुसार कौल आणि त्या आधारे असणारे अंदाज याला अर्थ उरत नाही. सत्तेत कोण येणार ते मतदार सांगतीलच. कदाचित त्रिशंकू परिस्थिती असेल. परंतु, त्रिशंकूचा विचार होताना दिसत नाही.
एका विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या अडीच लाख अशी धरू, त्यात प्रमुख पक्ष पाच आणि इतर अपक्ष उमेदवार पाहता मत विभागणीचा अंदाज लगेच येऊ शकतो. असे असताना एकाच पक्षाच्या बाजूने वुत्तवाहिन्यांनी दिलेला कौल विचार करायला लावणारा आहे. कौलातून लक्ष्य भेदण्याचे काम झाले आहे. लक्ष्यभेद म्हणजे लक्ष्यावर अचून नेम साधण्याची कृती. त्यामुळे सर्वांचेच लक्ष्य भाजपकडे केंद्रीत करून वृत्तवाहिन्यांनी इतर पक्षांकडे काणाडोळा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. देशात कॊंग्रेसविरोधी वातावरण होते. शिवसेना भाजप युती होती, त्याचा फायदा भाजपला झाला आणि देशात भाजपचे सरकार आले. यानंतर चार महिन्यांनी राज्याची विधानसभा निवडणूक झाली. निकाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र या निवडणुकीत ना युती आहे ना आघाडी त्यात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. याचा विचार करता सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत. मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार हे स्पष्ट आहे. असे असताना केवळ एकाच पक्षाला जास्त जागा मिळतील, असे विधान करणे योग्य ठरणार नाही. शिवसेना आणि कॊंग्रेस हे पक्ष राज्याच्या सर्व भागात पोहोचले आहेत. मात्र भाजप खरोखरच सर्व भागात पोहचला आहे का? हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी लोकसभा मतदारसंघात जिथे भाजपचा उमेदवार उभा होता तेथील जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. त्यावेळी भाजपला शिवसेनेची साथ होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी १९ तारखेची वाट पाहणे आणि जनमताचा खरा कौल काय आहे, हे पाहणे सुज्ञपणाचे ठरेल.
राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे. २००९ च्या निवडणुकीपेक्षा हा आकडा जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा मतदान होते, तेव्हा ते सरकारविरोधी असते, असे ढोबळमानाने राज्यशास्त्रात मानले जाते. तसे मानल्यास कॊंग्रेस आणि राष्ट्र्वादीच्या सरकार विरोधात शिवसेना, भाजप आणि मनसे या पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली आहे. असे असताना सरकारविरोधी लढणार्‍या भाजपच्या बाजूनेच निवडणुकीचा निकाल पूर्व कौल का झुकला आणि शिवसेना, मनसेच्या बाजूने का नाही? याबाबत विचार होणे महत्त्वाचे आहे.
कोणताही पक्ष जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत असतो. सत्ता मिळवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. त्यांचा नेता, पक्षाची विचारसरणी याचा मतदारांवर प्रभाव असतो. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात प्रचंड मेहनत घेतली. राज्यातील मतदारसंघ पिंजून काढले. या मेहनतीचे चीज १९ तारखेला दिसेलच. ज्याला जनतेचा आधार आहे, तो सत्तेत येईल पण त्या आधीच भाजप सोडल्या सर्वच पक्षांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्यांनी चालवला आहे.

.................................................
जल साठवणुकीचे  सोपे तंत्रज्ञान
शेतीला पाणी नाही म्हणणार्‍यांना वरदान
प्रसिद्धी-मुंबई तरुण भारत, दिनांक ६ ऑगस्ट २०१२

समाजसेवेचं बदलत स्वरुप
प्रशांत गायकवाड
published -aapla mahanagar- 18 sept 2011
माणूस म्हटला की स्वार्थी वृत्ती आलीच, मात्र या स्वार्थी वृत्तीच्या पलीकडे काही जाऊन काही माणसं त्यागी वृत्तीनं समाजाची सेवा बजावताना दिसतात. समाजाचं हित व्हाव हिच तळमळ त्यामागे असते. अशा माणसांना आपण मग समाजसेवक म्हणू लागतो. आपलं संपूर्ण ते समाजसेवेसाठी वाहून घेतात त्यामुळे ही माणसं आपल्या कर्तृत्वाने फार मोठी असतात.समाज त्यांच्याकडे आदराने पाहत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात आदराने नावं घेता येतील अशी थोर माणसं आपल्या देशात त्याचंप्रमाणे जगातही होऊन गेली. अलीकडच्या काळातील अण्णा हजारे, मेधा पाटकर, ही नावं समाजसेवक म्हणून आदराने घेतली जातात. अण्णांनी समाजसेवेचा वसा घेऊन समाजसेवकानं समाजाला कशा तर्‍हेने जागृत करावं हा आदर्शचं घालून दिला. मेद्या पाटकराचं ’नर्मदा ’ बचाव आंदोलनाचं कार्य आपण जाणतोच.अशी अजून काही सन्माननीय नावं घेता येतील. जे खर्‍या अर्थानं समाजसेवक होऊ शकतील.
प्रत्येकालाच आपण समाजाची सेवा करावी असं वाटत असतं पण सर्वांनांच ते शक्य होत नाही. तरीही काहीजण आपाआपल्या मार्गाने समाजाची सेवा करत असतात. मात्र याही पलीकडे एक गट असतो तो स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाची सेवा केल्याचं भासवून आपण समाजसेवक आहे असं भासवत असतो आणि आपलं ईसिप्त साध्य करून घेत असतो. हे सांगण्याचं कारण की मुंबईसह महाराष्ट्रात नुकताच दहिहंडी, गणेशोत्सव आणि रमझान हे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात आले. आता काही दिवसांनी नवरात्रोत्सवही साजरा करण्यात येईल. पालिकेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या उत्सवांमध्ये आपण कसे प्रसिध्द होऊ यासाठी जाणिवपूर्वक नियोजन करताना अनेक जण दिसले. गोविंदा पथकांसाठी गोविंदांनी घातलेले टीशर्ट महत्वाचे असतात .हे टीशर्ट राजकिय पक्ष किंवा व्यायामशाळांकडून दिले जातात.मात्र या दोघांबरोबरच त्या त्या विभागातील काही धनवान लोकांनी हे टीशर्ट गोविंदा पथकांना दिल्याचे उत्सवातं दिसलं. या टीशर्ट वर त्या धनवान लोकांचे फोटो आणि खाली समाजसेवक असं नावं असल्याचे दिसत होते. गणेशोत्सवात तर कहरच झाला. सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या परंपरेप्रमाणे अकरा दिवस साजरा केला जात असल्याने तथाकथित समाजसेवकांनी तर याचा पुरेपुर वापर केला. सातत्यानं अकरा दिवस या समाजसेवकांची असणारी कमान गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाजवळ दिसत होती.
हे गल्लोगल्ली उगवणारे नवसमाजसेवक पाहून समाजसेवेचं स्वरुप येणार्‍या काळात बदलणार हे नक्की.एक वेळ राजकीय पक्षांचं ठीक आहे .त्यांना वारंवार जनतेसमोर जाणं महत्वाचं असते. कारण सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणणं हेच त्यांच्या कार्यकर्त्यांसमोरिल आव्हानं असतं. पण या गल्लोगल्लीतील नवसमाजसेवकांचं काय? ते कशाला होर्डींग्ज लावून आपली प्रसिद्धी करत असतात. ’समाजसेवकानं आपल्या कार्यानं प्रसिध्द असावं ’ असं असताना कोणतंही कार्य न करता केवळ होर्डींग्जवर स्व:तची छ्बी झळकवून आपणच या विभागातील समाजसेवक आहोत असं भासवत आहेत. फक्त वह्यावाटप करण , विभागातील सरकारी रुग्णालयात फळ वाटप करण, एखादी पूजा आयोजित करणं, क्रिडा स्पर्धेचं आयोजन करणं अशी कामं ही गल्लोगल्लीतील समाजसेवक मंडळी करत आहेत. आणि त्यांच्याकडून झालेल्या या तथाकथित कार्याचे कार्यक्रमांचं आयोजन झाल्यानंतर होंर्डीग्जवर त्याची छायाचित्र लावून प्रसिध्दीही करत आहेत. हे सर्व करताना या समाजसेवक झालेल्या लोकांकडे हे कार्यक्रम साजरे करण्यासाठी इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न निर्माण होत आहे. बाहेर फिरताना , गळ्यात सोन्याची माळ , कडक इस्त्री केलेले सफेद कपडे या अवतारात हे गल्लोगल्लीतील समाजसेवक वावरत असतात. स्थानिक पोलीस स्टेशन , पालिका कार्यलयं, शिधावाटप कार्यालयं यांमध्येही यांचा वचक असतो. एकाच विभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक अशा प्रकारचे समाजसेवक असतात आणि त्यागी वृत्तीने कोणतेही सामाजिक कार्य न करता आपण कसे श्रेष्ट आहोत हे ते होंर्डींग्जवर आपले छायाचित्र झळकावून लोकांना दाखवत असतात.
आता काही महिन्यांनी मुंबई पालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पालिकेची रंगीत तालीम गणेशोत्सवात दिसली. मुंबई पालिकेतील अनेक प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छूकांनी गणेशोत्सवात आपली छ्बी असणारी होर्डिंग्ज गल्लोगल्ली झळकावली. स्वत:च्या पत्नीला येणार्‍या निवडणूकीत उभं करायचं यासाठी नवरोबांनी घर सोडून कधीही घराबाहेर कार्य न केलेल्या पत्नीला समाजसेवक पदाचा दर्जा दिलेला यावेळी दिसले. येणा‍र्‍या नवरात्रोत्सवात तर हे स्वरुप आणखी तीव्र होणार आहे. हे सर्व सांगण्याचं कारण असं की समाजसेवक होणं किती सोपं झालं आहे.
एखाद्या व्यक्तीला समाजसेवक बनायचं असेल तर किती श्रम करावे लागतात. त्यानंतर किती वर्षांनी त्याला त्याच्या कार्याची पोचपावती मिळते. खरा समाजसेवक कधीही .कोणत्याही पदाची लालसा करत नाही. आपलं काम निमूटपणं करत असतो, माणसं जोडत असतो. समाजावर प्रेम करत असतो.या उलट गल्लोगल्ली तयार होणारे समाजसेवक कोणत्या भावनेनं समाजाची सेवा करतात , हे लगेचचं दिसून येते. या समाजसेवकांवर अंकुश ठेवण्याची वेळ आता आली आहे.त्यासाठी विभागातील नागरिकांनी जागरुक होणं गरजेचं आहे. त्यांनी खरा समाजसेवक आणि खोटा समाजसेवक यांच्यातील फरक समजणं आवश्यक झालं आहे. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजसेवक असं बिरुद लावणार्‍या लोकांपासून नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या हक्कांबाबत प्रत्येक नागरिक जर जागरुक झाला तर आपण आपल्यातला समाजसेवक बाहेर काढून एका भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाची निर्मिती करू शकतो.


अण्णा हजारे
समाजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व
प्रशांत गायकवाड
published -aapla mahanagar- 4 sept 2011
आपल्या समाजकारणात आणि राजकारणात अनेक विभूती प्रतिमा आहेत आणि या प्रतिमा त्या त्या समाजघटकांना घट्ट चिटकून आहेत. त्या प्रतिमांना त्यांच्या अनुयायांनीच इतकं घट्ट बांधून ठेवलं आहे की या प्रतिमा ठराविक समाजघटकांच्या बाहेर अजूनही पडू शकलेल्या नाहीत. आपल्या कर्तबगारीने समाजातील असंतोष बाहेर काढणार्‍या व्यक्तींविषयी समाज आदर बाळगून असतो. त्या व्यक्तीची समाजाच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. कधी कधी तर त्या व्यक्तीचे दैवीकरणही होते आणि ती व्यक्ती विभूती बनते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दावरून देशभर आंदोलन छेडलं आणि देशातील समाजकारणाला एक वेगळीच दिशा मिळाली. अण्णा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यांची एक नवी प्रतिमा देशातील नागरिकांत तयार झाली. अलीकडच्या दशकांमध्ये देशातील समाजकारणात आदराने नाव घ्यावे असे नावच नव्हते. अण्णांनी ती किमया साधली. अर्थात अण्णांच्या आंदोलनाविरोधात नकारात्मक प्रतिक्रियाही उमटल्या, मात्र त्या प्रभावी ठरल्या नाहीत.
त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे देशात भ्रष्टाचारामुळे पिचलेल्या जनतेला आवाज मिळाला आणि देशातील जनतेसाठी अण्णा नवे प्रतीक बनले. खरे तर कोणताही ठोस वैचारिक पाया या आंदोलनाला नव्हता. त्यामुळे या आंदोलनाला अण्णावाद असे म्हणायचा प्रश्नच येत नाही. तरीही हे आंदोलन चालले, देशातील नागरिक यानिमित्ताने एकवटताना पाहायला मिळाले. व्यवस्थेबरोबर लढण्याची ही ताकद त्यांना कोणामुळे मिळाली तर अण्णांमुळे . हिंसक आंदोलनांपेक्षा अहिंसक मार्गांनी करण्यात येणार्‍या उपोषण आंदोलनात किती सामर्थ्य असते हे अण्णांनी जगाला दाखवून दिले आहे. यापुढेही माझा लढा सुरूच राहील हे अण्णांनी स्पष्ट केले आहे.
समाजात धुसमुसणारा जो आंतर्विरोध आहे त्याच्यावर अण्णांसारख्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रकाश पडतो. भारतीय राजकारणात आणि समाजकारणात भ्रष्टाचार खालपासून वरपर्यंत पसरला आहे. पैसे दिल्याशिवाय कामे होतच नाहीत ही सवय देशातील नागरिकांना राजकारणी आणि नोकरशहांनी लावून ठेवली आहे. याचा एक राग जनतेच्या मनात होता. तो अण्णांच्या आंदोलनामुळे मोठा प्रमाणावर बाहेर पडला. या आंदोलनात लोक स्वखुषीने बाहेर पडले आणि अण्णांना पाठिंबा देऊ लागले.
या आंदोलनामुळे अण्णाटोपी हे भ्रष्टाचारविरोधाचे एक नवे प्रतीक जन्माला आले. या टोपीवर 'मी अण्णा हजारे आहे', 'आय एम अण्णा हजारे' अशी अक्षरे लिहिलेली होती. ज्यामुळे लोकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची ताकद येत होती. अण्णांच्या या आंदोलनाला कोणताही धार्मिक वा राजकीय रंग नव्हता. राष्ट्रध्वज हातात फडकवत ठेवून हे आंदोलन करण्यात आले. साधारणपणे राजकीय पक्षांचे ध्वज स्पर्धात्मक राजकारण व्यक्त करतात. त्यामुळे विशिष्ट राजकीय भावनेला प्रोत्साहन मिळते, मात्र अण्णांच्या आंदोलनात कोणतेही स्पर्धात्मक राजकारण दिसले नाही. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असणारा तिरंगा फडकावून आंदोलन केले गेले. तिरंगा फडफडत राहणे विजयाचे लक्षण मानले जाते. तोच तिरंगा फडफडत राहिल्याने अण्णांच्या आंदोलनाचा विजय झाला.
अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी १६ ऑगस्ट रोजी आपले आंदोलन सुरू केले आणि पाहतापाहता हे आंदोलन देशभरात पसरले. यापूर्वी कधीही आंदोलनात भाग न घेतलेले अनेक नागरिक या वेळी रस्त्यावर उतरले, सोशल नेटवर्किंग साईटवरूनही युवा वर्गाने अण्णांना पाठिंबा देऊन आंदोलन चालवले. आंदोलनाला देशाचे दुसरे स्वातंत्र्य युध्द असे नाव देण्यात आले. देशात भ्रष्टाचार वाढला आहे, अनेक घोटाळे, प्रत्येक गोष्टीसाठी ावी लागणारी लाच, याशिवाय कामेच होत नाहीत. या प्रकारांमुळे देशातील जनता संतप्त झाली आहे. याचाच परिणाम अण्णांना मोठा प्रमाणावर पाठिंबा मिळण्यात झाला आहे. साधे रेशनकार्ड ते ड्रायव्हिग लायसन्स बनवण्यापासून हा भ्रष्टाचार सुरू होतो, जो अनधिकृत वडापाव, भेळ यांच्या गाडीवर दिसतो, बिल्डर्संना इमारत बांधायची असेल तिथे दिसतो, शाळा, महाविालय या पवित्र ठिकाणी दिसतो. देशातील प्रत्येक नागरिकाने जर ठरवले की आपण एकही पैसा न देता आपले काम करून घेणार तरच भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल. अण्णांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे यामुळे देशातील नागरिक जागरूक झाला.
या आंदोलनामुळे भ्रष्टाचारविरोधाच्या नव्या चळवळीला सुरुवात झाली. देशात वैचारिक पाया घट्ट रोवणार्‍या डाव्या आणि उजव्या चळवळी मागे पडल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले. अलीकडच्या काळात समाजापासून दूर गेलेले बुध्दिवंत आणि विचारवंत एकत्र आल्याचे दिसले. प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाला दिलेली योग्य साथ यामुळे अण्णांच्या आंदोलनाला बळकटी प्राप्त झाली. अण्णांनी भ्रष्टाचारविरोधाची धार अजून तीव्र केल्यास आणि या आंदोलनाला योग्य दिशा मिळाल्यास येणार्‍या काळात या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि भ्रष्टाचारमुक्त देशाची आपोआपच निर्मिती होईल.

published -aapla mahanagar- 21 aug 2011



published -aapla mahanagar- 14 aug 2011

प्रतिद्न्या मोडली माझी

तुला पाहताच प्रतिद्न्या मी मोडली आहे,
कसे सांगू अनेक वादळांनी मी वेढलो आहे

मन-भावना सांगण्याचा मोह आवरत नाही
तुझ्या नकाराचे दुख्: सोसवत नाही

ठरवल होत ब्रम्हचर्य पत्कराव पण
तुझ्या शांत शांत स्वभावानं पार कोसळलो आहे

सागरी किनार्‍यावर जाऊनी
अथांग लाटांना विचारून सांगतो मी

रात्रीचा दिवस करून् विचारांती पत्र लिहीले तुला
ते वाचूनी काहीच न उत्तर दिलेस मला

निराश होऊन खिन्न मनानं परतलो
प्रतिद्न्या मोडुनी पार संपलो होतो मी

असल्याने आशावादी वाट तुझी पाहतो
संपले जरी जिवन तुला शोधतो आहे.

प्रशांत.

वेलेंटाईन डे आणि मन्याचा राजकिय उत्कर्ष
। प्रशांत गायकवाड
मन्या खुष झाला होता,कारण वेलेंटाईन डे जवळ येणार होता. आपण तिला प्रपोझ मारणार
आणि ती आपल्याला हो बोलणार या कल्पनेने तो सुखावला होता. गेले काही दिवस तो
मस्त मुड मध्ये होता. तसा मन्या बारावी पास पण त्यापुढे शिक्षणाचा ,खास करून
इंग्रजीची भितीने त्याने शिक्षणाला रामराम केला होता. तेव्हापासून कडक इस्त्री
केलेले शर्ट , पॆंट घालून नाक्यावर उभे राहणे, सिगारेट फुंकणे असे आयुष्याचा
वेळ वाया घालवण्याचे प्रकार तो करू लागला होता. अचानक एके दिवशी त्याला मनी
दिसली. लहानपणी तिला पाहिलेली. तिच्यात झालेला बदल पाहून मन्या प्रेमात पडला
मनी मन्याच्याचा मोहल्यात राहणारी , रोज सकाळी उठून कॊलेजात जाणारी. तर मन्या
रोज सकाळी उठून नाक्यावर उभा राहणारा. दिवसांमागून दिवस जात होते. मन्या मनीला
पाहत होता , मनी मन्याला पाहत होती.पण साला मन्याची तिला विचारण्याची हिंम्मत
होती. आता काय करावे हा प्रश्न मन्याला सतत सतावत होता ? मग त्याला त्याच्या
नाकेकरी मित्राने सल्ला दिला अरे मन्या , वेलेंटाईन जवळ येतोय. विचारून टाक , हो
बोलेलच . यावेळेला कोणीही नाही म्हणत नाही ,बिंनधास्त जा. लाईन पक्कीच. मित्राच्या
या बोलण्याने मन्या सुखावला होता, त्याला स्वप्ने पडु लागली होती , आता मनी हो
बोलणार, मग आपण सुधारणार ,नाका वैगेरे सगळे सोडणार , शिकणार काम करणार.
अशा आपल्या आयुष्याच्या कल्पना त्याने रंगवल्या होत्या.
इथे ’वेलेंटाईन डे’ जवळ येत होता. ग्रीटींग्ज, भेटवस्तूंनी दुकाने सजली होती.मन्याल
वाटले आपणही भेटकार्ड आणि छानशी वस्तू मनीला देऊ. वेलेंटाईन डे आला.मन्याने
भेटकार्ड आणि वस्तूसाठी आईकडून पैसे घेतले होते. इथे मनी कॊलेजात जायला
निघालेली असते. मन्या कडक इस्त्री केलेले शर्ट पेंट घालून परफ्युम मारून
मनीच्या समोर येतो. थांब मनी , ती थांबते. इथे मन्या मनातल्या मनात घाबरलेला .
बोल, काय काम आहे रे ? मनी म्हणते. मन्या थरथरल्या हातांनी तिला भेटकार्ड
भेटवस्तू देतो. आणि म्हणतो , मला तु खुप आवडतेस , माझे तुझ्यावर प्रेम आहे. इथे
मनी भडकते तुझी हिंम्मतच कशी झाली , मला विचारायची. असे म्हणुन मन्याच्या
श्रीमुखात भडकावते. चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन. असे म्हणुन ती
निघून जाते. इथे मन्या रडकुंडीला आलेला असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला
असतो. तो जाम भडकतो. त्याचे मित्र त्याच सात्वन करत असतात.

याच सुमारास काही ठीकाणी वेलेंटाईन डे ला विरोध होत असल्याची बातमी मन्याच्या
कानावर येते . अचानक मन्या पलटतो. ही आपली परंपरा नाही. पाश्चात्य आहे असे तो
म्हणू लागतो. नाक्यावरच्या मुलांना घेऊम उठतो. विरोध झालाच पाहीजे, वेलेंटाईन
डे हाणुन पाडलाच पाहिजे अशा घोषणा तो देऊ लागतो. ज्या दुकानातून त्याने मनीसाठी
भेटवस्तू घेतली असते त्याच दुकानात जाऊन तोडफोड करतो. इथे टीव्हीवर मन्या झळकू
लागतो.वेलेंटाईन डे ला विरोध केल्याने त्याला प्रसिध्दी मिळते. ज्या पार्टीने
विरोध केला त्याचे वरिष्ट नेतृत्व मन्याची दखल घेते. आपल्या पक्षाची लाज
राखल्याबद्द्ल त्याला आगामी पालिका निवड्णूकीत नगरसेवक पदाचे तिकीट देते . मन्या
निवडून आलेला असतो. तो यापुढे दरवर्षी वेलेंटाईन ला विरोध करणार असतो. आता
मनीला मन्याच्या कानफडात मारल्याच्या पश्चाताप होत असतो. पण त्या बिच्चारीला
काय महित असते की, आपल्यामुळेच मन्या नावारुपाला आला( इथे प्रत्येक यशस्वी
पुरुषाच्या मागे स्त्री असते हे तंतोतंत लागू पडलेले आहे) मन्याला आमदारकीचे तिकीट मिळणार असते.
गल्लीतल्या मन्या आता साहेब झालेला असतो.

Followers